राज्यातील नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने उल्लेखनीय यश मिळवले आहे. सोलर, विंड आणि हायड्रोऊर्जेच्या क्षेत्रात राज्याने आता भरारी घेतली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “लेखाचे उत्तर लेखानेच दिले आहे आणि ते आकडेवारीसहित आहे. त्यामुळे आता तरी राहुल गांधी बोलताना आणि लिहिताना काळजी घेतील,” असा टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर, राहुल गांधी यांच्या टीकेवर अधिक मिश्कील टिप्पणी करत फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी यांनी या चुका आयुष्यभर केल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर धूळ होती, पण त्यांनी आतापर्यंत फक्त आरसाच पुसलेला आहे.”
'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेबाबत विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, “या टीकेला काही अर्थ नाही. 'सामना' या वर्तमानपत्राला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असतानाच वजन होतं. आता त्या पेपरला काही महत्त्व उरलेलं नाही.”
सामाजिक आणि मागासवर्गीय विभागाचा निधी 'लाडकी बहीण' योजनेसाठी वळवण्यात आल्याच्या आरोपावर फडणवीस म्हणाले की, “घटनेनुसार जातीय विभागाचा निधी त्या विभागाच्या मुख्य हेड अंतर्गतच खर्च केला जातो. कोणताही निधी वळवलेला नाही.” यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्ट स्पष्टीकरण दिल्याचे त्यांनी नमूद केले. “लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र निधी राखीव ठेवलेला आहे,” असेही त्यांनी सांगितले.
साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून नेहमीच सहकार्य असेल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध विषयांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत राजकीय विरोधकांच्या टीकांना सामोरे जात आपली भूमिका स्पष्ट केली.