बारामतीमध्ये आज (२९ ऑक्टोबर) शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. दिवंगत उद्योगपती रतन टाटा महाराष्ट्रात उद्योग आणणार होते. पण भाजप आणि राज्य सरकारने हे उद्योग गुजरातमध्ये नेले, असा आरोप शरद पवारांनी केला होता. यावरच प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवर एक पोस्ट केली आहे. . या वयात इतके खोटे बोलायचे नसते, अशी टीकाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच ट्वीट
या वयात इतके खोटे बोलायचे नसते...
काल जयराम रमेशजी आणि आज शरद पवारजी,
ज्यांच्या काळात गुंतवणूक आणण्यात कधी गुजरात तर कधी कर्नाटक नंबर 1 वर होते, ते आज महाराष्ट्र क्रमांक 1 वर आल्यावर जरा अधिकच अस्वस्थ झालेत.
तरी सुद्धा खोटा नरेटिव्ह सेट होण्यापूर्वी वास्तव महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगावे लागेल...
टाटा एअरबस
1) सप्टेंबर 2021 : टाटा-एअरबस प्रकल्पाचा एमओयू (सोबत स्व. रतन टाटाजी यांचे 24 सप्टेंबर2021 रोजीचे ट्विट : https://x.com/RNTata2000/status/1441293117123039240 )
2) साधारणत: एमओयूच्यावेळीच प्रकल्प कुठे होणार हे ठरले असते, हा संकेत. (सोबत : हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याचे 14 फेब्रुवारी2022 चे बिझनेस वर्ल्डचे वृत्त : https://businessworld.in/article/airbus-tata-aircraft-manufacturing-facility-likely-in-gujarat--420476 )
3) एमओयूच्यावेळी गुजरात आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांचा विचार होत होता. (सोबत 23 सप्टेंबर 2021 चे जागरणने प्रकाशित केलेले वृत्त : https://jagran.com/jharkhand/jamshedpur-tata-airbus-will-set-up-plant-in-uttar-pradesh-and-gujarat-22-thousand-crore-deal-has-been-done-22046171.html)
आता या संपूर्ण कालखंडात राज्यात सरकार होते, महाविकास आघाडीचे.
त्यांच्याच काळात टाटांचे अधिकारी नागपुरात एमएडीसीच्या कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना प्रतिसाद द्यायलाही कुणी तयार नव्हते.
महाविकास आघाडीचे सरकार असतानाच या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये 4 जागा निश्चित करण्यात आल्यासंदर्भात इंडियन एक्सप्रेस वृत्तसमूहाने त्यावर सविस्तर वृत्त प्रकाशित केले. (सोबत वर्तमानपत्राचे कात्रण जोडले आहे.)
फॉक्सकॉन
फॉक्सकॉनने पहिले पत्र महाराष्ट्राला लिहिले 5 जानेवारी 2022 ला. संपूर्ण घटनाक्रम समजून घ्या.
5 मे 2022 : फॉक्सकॉनकडून दुसरे पत्र
14 मे 2022 : उद्योग विभागाकडे फॉक्सकॉनचा रितसर अर्ज
24 मे 2022 : दावोस येथे प्रतिनिधी मंडळाची वेदांता समूहाशी चर्चा
24 मे 2022 : तळेगाव येथील जागेची पाहणी
13 जून 2022 : फॉक्सकॉनला पॅकेज(पण, उच्चस्तरिय समिती आणि मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता नसलेले, जी बैठक श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत म्हणजे 29 जून 2022 पर्यंत एकदाही झाली नाही.)
24 जून 2022 : फॉक्सकॉन समूहाच्या अध्यक्षांशी तत्कालिन उद्योगमंत्र्यांची चर्चा.
राज्यात एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे सरकार आल्यावर 14 जुलै रोजी वेदांता समूहाकडून पहिले पत्र आले. 26 जुलैला मुख्यमंत्री कार्यालयात बैठक झाली आणि लगेच उपसमितीची बैठक घेत, 38,000 कोटींचे पॅकेज मंजूर केले. पण, हा प्रकल्प महाराष्ट्रात येणारच नाही, असे त्यावेळचे उद्योगमंत्री वारंवार सांगत होते. (सोबत त्यासंदर्भातील ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे 7 जानेवारी 2020 रोजीचे वृत्त : https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/foxconn-wont-set-up-proposed-unit-in-maharashtra-says-shiv-sena-minister/articleshow/73133222.cms )
टाटा एअरबस, फॉक्सकॉन असो, किंवा अन्य प्रकल्प सातत्याने खोटे बोलून मविआच्या नेत्यांनी दिशाभूल केली. सॅफ्रॅनच्या बाबतीत तर कहरच केला होता. कंपनीने 2 मार्च 2021 लाच हैदराबादेत त्यांच्या प्रकल्पाचे उदघाटन केले होते. पण, आमचे सरकार आल्यावर तोही प्रकल्प गुजरातला गेल्याची आरोळी उठवली गेली. 31 ऑक्टोबर2022 रोजी या सर्वांबाबत मी स्वत: मंत्रालयात एक पत्रपरिषद घेतली होती. (ती पत्रपरिषद पुन्हा ऐकायची असेल तर त्याची ही लिंक : https://youtube.com/watch?v=pEp5UJRSJHM) सर्व मुद्यांचे सविस्तर सादरीकरण केले होते. पण, पुन्हा पुन्हा खोटे बोलून तोच तो अजेंडा सांगितला जात आहे. स्वत:जवळ काही सांगण्यासारखे नसले तर खोट्याशिवाय कशाचाच सहारा नसतो, हेच सत्य आहे.
असू द्या. एकिकडे 52 टक्के परकीय गुंतवणूक राज्यात आणणारे सरकार आहे आणि दुसरीकडे गुजरातच्या ब्रँड अॅम्बॅसिडरच्या भूमिकेतील कर्तव्यशून्य महाविकास आघाडी.
राज्यातील जनताच याचा निकाल 20 नोव्हेंबरला लावेल.