आज मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहावर सुरु असलेली बैठक संपली आहे. या बैठकीत जालन्यात जे आंदोलन झाले त्याची चर्चा करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाठीचार्ज, अश्रूधूर याचा वापर करण्यात आला. ही दुर्दैवी घटना आहे. बळाचा वापर करण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. बळाचा वापर करण्याचं कोणतही कारण नव्हतं. त्यामुळे यात जे जखमी झाले आहेत, शासनाच्या वतीने मी त्यांची क्षमा मागतो.
घटनेचे राजकारण करणे योग्य नाही. काही नेत्यांनी केलेले आरोप दुर्दैवी आहेत. लाठीचार्जचे आदेश वरुन आले असा दृष्टीकोण तयार करण्यात आला. लाठीचार्जचा आदेश एसपी आणि डीवायएसपी यांना असतात. त्यासाठी त्यांना कोणालाही विचारावं लागत नाही.