आपली महायुती विकासाची गाडी आहे. या गाडीला मोदींचं पॉवरफुल इंजिन आहे. प्रत्येक पक्षाचे डब्बे या गाडीला लागले आहेत. या गाडीत शेतकरी, दिनदलित, गोरगरिब, अल्पसंख्यांक, आदिवासी, शेतमजूर, महिला, ओबीसी यांना सोबत घेऊन ही गाडी विकासाकडे जाणार आहे. पण राहुल गांधींच्या गाडीला डब्बे नाही, तिकडे फक्त इंजिनच आहे. यांच्या इंजिनमध्ये तुम्हाला बसण्यासाठी जागा नाहीय. मोदींच्या ट्रेनमध्येच तुम्हाला बसण्यासाठी जागा आहे. त्यामुळे अर्चना पाटील यांच्या घड्याळाचं बटण दाबलं की बारशीसह उस्मानाबादची बोगी ही थेट मोदींच्या ट्रेनला लागते आणि ती ट्रेन आपल्या सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या दिशेनं निघते, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारसभेत धाराशिवमध्ये बोलत होते.
फडणवीस जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. कोण या देशाला महाशक्ती करु शकतो, कोण देशाला सुरक्षित ठेऊ शकतो, देशाचा विकास कोण करु शकतो, देशाचा या आशा आकांक्षा कोण पूर्ण करणार, याचा निर्णय घेणारी ही निवडणूक आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी एकत्र झाली आहे. राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे. उद्धव ठाकरे, लालूप्रसाद यादव, मुलायम सिंग यांचा मुलगाही म्हणतो मी इंजिन आहे. ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे बसू शकतात. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे बसू शकतात.
अर्चना ताईंना दिलेलं मत हे मोदींना दिलेलं मत आहे. अन्य कुणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे. दहा वर्षात मोदींनी २० कोटी गरिबांना कच्च्या घरातून पक्क्या घरात आणलं. ५० कोटी लोकांच्या घरात गॅस पोहोचला. ६० कोटी लोकांकडे शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवलं. ८० कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदींनी केलं. मोदींनी ८० लाख बचत गट तयार केले. त्या बचत गटांना ८ लाख कोटी रुपये कर्ज दिलं. १० कोटी महिला या बचत गटांमुळे स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या.
मोदींनी सांगितलंय, ३ कोटी महिलांना लवकरच लखपती दीदी बनवणार आहेत. महिलांना मदत करून कुटुंबाला उभं करणारे मोदी आहेत. मोदींनी वयोस्कर लोकांना वयोश्रीसारखी योजना दिली. घरातील वृद्ध लोक आता कुटुंबासाठी ओझं असणार नाहीत. कारण मोदींनी त्यांची जबाबदारी घेतली आहे. मोदींच्या माध्यमातून नैसर्गिक शेती सुरु झाली आणि शेतकऱ्याला शेतमाल विकता यावा यासाठी मोदींनी व्यवस्था केली. रशिया आणि युक्रेनचं युद्ध, तसंच आखाती देशांतील युद्धामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे भाव पडले.
सोयाबिनच्या शेतकऱ्याला कमी भाव मिळाला, त्यासाठी भावांतर योजना सुरु केलीय. आचारसंहिता संपवल्यावर भावांतर योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसै जमा होणार आहेत. कांद्याचं शॉर्टेज तयार झालं होतं. देशात उत्पादन कमी होऊ नये म्हणून निर्यातबंदी लागली होती. कालच निर्यातबंदी उठवली आहे. मागील काळाता आम्ही कांद्याला अनुदान दिलं. आताही या निर्यातबंदीच्या काळात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
कोणताही शेतकरी अडचणीत येऊ देणार नाही, असा आमचा निर्धार आहे. अकराव्या क्रमांकावर असलेली आपली अर्थव्यवस्था मोदींनी जगात पाचव्या क्रमांकावर आणली आहे. युपीएचं सरकार रस्ते, वीज, पाणी, रेल्वेसाठी वर्षाला एक लाख कोटी रुपये खर्च करायचे. पण मोदींनी एक लाख कोटींवरून १३ लाख कोटींपर्यंत बजेट वाढवलं. मोदींनी अर्थव्यवस्था मजबूत केली. मोदींनी देशात गरीब कल्याणाचा अजेंडा चालू ठेवला आहे, असंही फडणवीस म्हणाले.