नागपुरमध्ये झालेल्या हिंसाचारावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरमध्ये वरिष्ठ पोलीस आयुक्तांशी बैठक घेत पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये दगडफेक करण्यात आली होती, तोडफोड झाली, पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले होते तसेच अनेक पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला असून यात पोलिस जखमी झाले होते. त्यामुळे या हिंसाचारामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले.
"आतापर्यंत 104 लोक ताब्यात" - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "औरंगजेबची कबर जाळत असताना कुराण ची आयत लिहलेली चादर जाळली असा समाज माध्यमावर काही लोकांनी अपप्रचार केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव जमला गाड्या फोडल्या, दगड फेक केली, त्यानंतर पोलिसांनी यासगळ्यावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक असतील त्या उपाययोजना केल्या. काही लोकांनी केलेले चित्रीकरण आणि पोलिसांकडे असलेले चित्रीकरण ते तपासून कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 104 लोकांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये 92 लोकांना अटक करण्यात आली आहे, तर काही 12 तरुण अल्पवयीन आहेत जे 18 वर्षाच्या खाली आहेत त्यांच्यावर कायद्याने जी कारवाई करण्यात येईल ती कारवाई करण्यात आली आहे. जो जो हिंसाचार करतोय अशा सर्वांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सोशल मिडिया ट्रॅक करून घटना घडावी म्हणून काम केल त्या लोकांवर देखील सहआरोपी म्हणून कारवाई केली जाणार. आत्तापर्यंत 68 पोस्टची तपासणी करून कारवाई केली आहे".
नुकसान झालेल्यांना भरपाई मिळणार - देवेंद्र फडणवीस
पुढे ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांच्या भरपाई बद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या हिंसाचारामध्ये काही लोकांच्या गाड्या फुटल्या, "अनेक लोकांच नुकसान झालं त्या सर्वांना येत्या तीन चार दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. यासाठी स्वतः पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे लक्ष घालून आहे. संचार बंदीमुळे व्यापारात अडचण येत असल्यामुळे त्यावर पोलिस शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करतील. नुकसान झालेली ही सगळी भरपाई वसून करण्यासाठी दंगलखोरांची संपती जप्त करून भरपाई वसूल केली जाणार. 1992 नंतर नागपूरात अशी घटना कधीच घडली नाही. ज्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये सर्व तपास सुरू आहे", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.