‘नवसाला पावणारा राजा’ अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या उत्सवात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत आहेत.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी विशेष गर्दी पहायला मिळत आहे. असे मानले जाते की, लालबागचा राजा नवसाला पावतो. त्यामुळे नवस फळाला आल्यावर अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने दान अर्पण करतात.
गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून, लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या दानाची मोजदाद सुरू करण्यात येते. लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून भरभरुन दान होत आहे. भाविकांनी आत्तापर्यंत 73 लाख 10 हजार रुपयांचं दान केलं आहे. यापैकी 38 लाख 10 हजार रुपयांचे दान व्यासपीठावरच्या दानपेटीत दान केला आहे. तर रांगेतल्या पेटीत भाविकांनी 35 लाख दान केलं आहे. या मोजदादीचे काम बँक ऑफ महाराष्ट्र आणि जीएस महानगर बँकेचे कर्मचारी पार पाडत आहेत.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या दानातून मिळालेल्या निधीचा उपयोग गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी उपक्रमांमध्ये करत असते. सध्या मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी आणि कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत मोजदादीची प्रक्रिया सुरू आहे. लालबागचा राजा हा केवळ गणेशभक्तांचा आस्थेचा केंद्रबिंदू नाही, तर समाजकल्याणाचा एक सशक्त माध्यमही ठरतो आहे.