बीडमधील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला एप्रिलमध्ये चार महिने होत असून त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी त्यांचे भाऊ धनंजय देशमुख सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सर्व महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेतली असून बुधवारी बीड दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील त्यांनी भेट घेतली. दहा मिनिटांच्या भेटीत त्यांनी कारागृहातील कैद्यांच्या शिफ्टींगचा विषय अजित पवार यांच्यासमोर मांडला. तसेच विविध विषयांबाबत मत व्यक्त केले. यावेळी आपल्या मागण्यांचा अहवाल सादर करण्याचे अजित पवार यांनी धनंजय देशमुख यांना सांगितले असून त्यानुसार लेखी स्वरुपातील अहवाल ते अजितदादांना देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी बीड दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात युवा कार्यकर्त्यांना सतर्क केलं. बीडमधील काही चुकीच्या गोष्टी बदलायच्या आहेत. कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. सोशल मिडीयाचा वापर चुकीच्या पद्धतीने करत आहेत, ते वेळीच सुधारा. चुकीची कामं करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकणार, असा थेट इशारा अजित पवार यांनी दिला.