मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याच्या प्रकरणात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे दोषी ठरले आहेत. सत्र न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निकाल कायम ठेवत शिक्षा अबाधित ठेवली आहे. या निर्णयानंतर नाशिक पोलिसांनी कोकाटे यांच्याविरोधात अटकेचे आदेश काढले आहेत. वॉरंट निघताच कोकाटे हे लिलावती रुग्णालयात दाखल झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्याने त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकी दोन्ही संकटात आली आहेत. या निर्णयाला थांबवण्यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
या घडामोडी सुरू असतानाच माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. कोकाटे यांचे पद धोक्यात असतानाच धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत, त्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.
याआधीही मुंडेंची हालचाल
माहितीनुसार, अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे सध्या दिल्लीत असून त्यांनी एनडीएतील काही ज्येष्ठ नेत्यांशी भेटी घेतल्या आहेत. या भेटींमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, कोकाटे अडचणीत असतानाच मुंडेंचा दिल्ली दौरा झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यापूर्वी विधानसभेत माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमी खेळताना दिसल्यावर त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. त्या वेळीही धनंजय मुंडे सक्रिय झाले होते आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता मात्र मुंडेंनी थेट दिल्ली गाठल्याने चर्चांना आणखी उधाण आले आहे.
मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची शक्यता कायम असून त्यांचे मंत्रिपद कधीही जाऊ शकते, असे बोलले जात आहे. त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर येत्या शुक्रवारी (१९ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. जर कोकाटे यांना दिलासा मिळाला नाही, तर महायुती सरकारमध्ये त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याबाबतही चर्चा सुरू झाल्याचे समजते. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
थोडक्यात
मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याच्या प्रकरणात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे दोषी ठरले आहेत.
सत्र न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निकाल कायम ठेवत शिक्षा अबाधित ठेवली आहे.
त्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.