करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असून 'तुझे १८ तुकडे करेन', अस म्हटल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी दोघांमधील वादग्रस्त खटल्याचा निकाल लागला असून हा निकाल करुणा मुंडे यांच्या बाजूने लागला होता. तेव्हापासूनच आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्या सांगतात. यासंबंधीत ऑडिओ क्लिपदेखील जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाल्या करुणा मुंडे
"धनंजय मुंडे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली." करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप करत कोर्टात लेखी तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे. "तुझे 18 तुकडे करणार", फोनद्वारे धनंजय मुंडे यांनी धमकी दिल्याचं करुणा मुंडे सांगतात. "12 दिवसांपूर्वी मला धमकी देण्यात आली आहे. अजून मी मुंडे कुटुंबाबद्दल 50 टक्के पण तोंड उघडले नाही. उघडायला लाऊ नका. धमकी संदर्भात माझ्याकडे ऑडिओ क्लिप लवकरच कोर्टात पुरावे सादर करणार आहे. मुंडे यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावं," अस आव्हान करुणा मुंडे यांनी केलं. "धनंजय मुंडे यांच्या लोकांकडून धमकी दिली जात आहे. तुझे अंघोळ करतानाचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत, आम्ही ते व्हायरल करू, असं धमकावलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला न्याय दिला नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.