महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. बीड जिल्हा न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. स्वतःला धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेली फौजदारी तक्रार न्यायालयाने फेटाळल्याने मुंडे यांना राजकीयदृष्ट्या मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
करुणा मुंडे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या धनंजय मुंडे यांच्या नामांकन पत्रावर आक्षेप घेतला होता. त्यांनी तक्रारीत असा आरोप केला होता की, मुंडे यांनी उमेदवारी अर्जात वैयक्तिक माहिती लपवली असून त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील न्यायालयाने हा दावा पूर्णतः फेटाळून लावला. न्यायिक दंडाधिकारी दीपक बोर्डे यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले की, धनंजय मुंडे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कोणतीही महत्त्वाची माहिती लपवलेली नाही. तसेच कथित माहिती लपवण्याचा निवडणूक निकालावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाने पुढे असेही स्पष्ट केले की, तक्रारदार करुणा मुंडे या आरोपीविरोधात प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांची फौजदारी तक्रार फेटाळण्यात येत असल्याचा आदेश न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांच्यावर सुरू असलेल्या कायदेशीर अडचणींना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा धनंजय मुंडे फडणवीस सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी सक्रिय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार गटाकडूनही त्यांच्या पुनरागमनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजीनामा
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला होता आणि त्याचा परिणाम म्हणून मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
आता करुणा शर्मा-मुंडे प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर, मुंडे यांचे राजकीय पुनरागमन लवकरच होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि सत्ताधारी आघाडीच्या नेतृत्वाकडूनच घेतला जाणार असल्याचे स्पष्ट आहे. धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होते की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.