हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘हिमॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरातील सिनेप्रेमींमध्ये शोकाची लाट उसळली आहे. अनेक दशकं रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी आज जुहू येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांनी तात्काळ जाहीर केली नाही. मागील काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर अफवा आणि खोट्या बातम्या पसरल्या होत्या. त्यामुळे कुटुंबीयांनी अनावश्यक गोंधळ आणि गर्दी टाळण्यासाठी ही बाब काही काळ खाजगी ठेवली, अशी माहिती समोर येत आहे. अचानक बातमी जाहीर केल्यास घराबाहेर मोठी गर्दी होण्याची शक्यता होती, याच कारणामुळे कुटुंबीयांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
निधनानंतर धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर घाईत अंत्यसंस्कार करण्यात आले. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. मात्र गर्दी, सुरक्षा आणि कुटुंबीयांची मानसिक अवस्था लक्षात घेऊनच हा निर्णय घेतल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितले.
अंत्यसंस्काराला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित होते. अमिताभ बच्चन, सलीम खान, आमिर खान, सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि अक्षय कुमार यांनी धर्मेंद्र यांना शेवटचा निरोप दिला. धर्मेंद्र यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.