भारत ‘ए’ आणि ऑस्ट्रेलिया ‘ए’ संघांदरम्यान दोन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनऊमध्ये खेळला गेला आणि तो बरोबरीत सुटला. मात्र दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर यांनी या सामन्यातून माघार घेतली असून आता संघाचे नेतृत्व ध्रुव जुरेल करणार आहे.
अय्यरने स्वतःला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असून ते मुंबईत परतले आहेत. त्यांनी निवड समितीला आपल्या अनुपलब्धतेची माहितीही दिली आहे. पहिल्या सामन्यात अय्यर पहिल्या डावात फक्त आठ धावा करू शकले होते. मात्र, ते २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध राहतील, अशी अपेक्षा आहे.
अय्यरच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलला नेतृत्वाची संधी मिळाली आहे. पहिल्या सामन्यात ते उपकर्णधार होते आणि आता कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली असून या जबाबदारीतून स्वतःला सिद्ध करण्याची त्यांना मोठी संधी मिळणार आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदलही झाले आहेत. के.एल. राहुल आणि मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. सिराजला खलील अहमदच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी गुडघ्याच्या दुखापतीमुळे या सामन्यातही खेळू शकणार नाहीत.
लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर २३ सप्टेंबरपासून दुसरा सामना रंगणार आहे. अय्यरच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलच्या नेतृत्वावर सर्वांचे लक्ष लागले आहे.