(Uddhav Thackeray) नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट टीका केली. फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी ‘कोण होतास तू, काय झालास तू’ असे म्हणत उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला होता. त्यावर ठाकरेंनीही तितक्याच कडव्या शब्दांत प्रत्युत्तर देत, “मला मुख्यमंत्र्यांची दया येते, एवढे भ्रष्टाचारी लोक जवळ घेतलंस तू, पांघरुणात घेतलंस तू,” असे म्हणत पलटवार केला.
अमित शाहांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, शाह मला हिंदुत्व शिकवण्याच्या भूमिकेत नसून आधी त्यांनी स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांकडे पाहावे. किरण रिजीजू यांच्या बीफविषयीच्या विधानाचा दाखला देत ठाकरेंनी शाहांना सवाल केला की, अशा मंत्र्यांवर तुम्ही कारवाई करणार की नाही? याशिवाय, जय शाह पाकिस्तानसोबत भारताला खेळायला लावतात, यावरही ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला.
राज्यातील शेतकरी मदतीवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. केंद्राकडून प्रस्ताव मागवला नसल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची आणि नुकसानभरपाईची मदत योग्यरीत्या मिळत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. तसेच, विरोधी पक्षनेते पदाबाबत अद्याप निर्णय न घेणे हा सरकारचा विरोधकांना कमी लेखण्याचा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
नगरपालिका निवडणुकांमध्ये झालेल्या दंडेलशाही, पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर आणि प्रशासनाच्या वागणुकीवरही उद्धव ठाकरे संताप व्यक्त करताना दिसले. “अशा निवडणुका मी कधी पाहिल्या नाहीत,” असे म्हणत त्यांनी या निवडणुकांचा समाचार घेतला. दरम्यान, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे आश्वासन दिले होते, ते अद्याप पूर्ण न झाल्याचेही त्यांनी सरकारला लक्षात आणून दिले.
थोडक्यात
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट टीका केली.
त्यावर ठाकरेंनीही तितक्याच कडव्या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.