राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिल्यामुळे त्यांना कधीही पोलिस ताब्यात घेऊ शकतात. या घडामोडीमुळे कोकाटे यांचे मंत्रीपदही अडचणीत आले आहे.
मंगळवारी नाशिक उच्च न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दिलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. या निकालानंतर या प्रकरणातील तक्रारदार अंजली दिघोळ राठोड यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिले. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली असून, शिक्षेला स्थगिती मिळावी अशी विनंती करणार असल्याची माहिती आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोकाटे यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत पक्षाकडून माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर कोकाटे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो.
सध्या माणिकराव कोकाटे रुग्णालयात उपचार घेत असून याची माहिती न्यायालयाला देण्यात येणार आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याच्या आरोपामुळे ते आधीच अडचणीत आले आहेत. जर मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना त्वरित दिलासा मिळाला नाही, तर त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अटक वॉरंट निघाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
थोडक्यात
राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिल्यामुळे त्यांना कधीही पोलिस ताब्यात घेऊ शकतात.
या घडामोडीमुळे कोकाटे यांचे मंत्रीपदही अडचणीत आले आहे.