सातारा जिल्ह्यात नुकत्याच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. शहरातील निवडणुकीचा उत्साह ओसरत असतानाच ग्रामीण भागात नव्या निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे गावाकडील कार्यकर्ते आता झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करत आहेत. इच्छुक उमेदवारांनी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून 21 तारखेला मतमोजणीही झाली. याच काळात निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 65 गट आणि पंचायत समितीचे 130 गण आहेत. येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मागील निवडणुकांमध्ये महायुतीने चांगले यश मिळवले असून त्यात भाजपचा प्रभाव अधिक दिसून आला. आता त्याच पार्श्वभूमीवर आगामी ग्रामीण निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपालिका निवडणुका संपल्यानंतर शहरातील राजकीय हालचाली आता गावाकडे वळताना दिसत आहेत. प्रत्येक गावात आणि चौकात कोणत्या गटातून कोण उमेदवार उभा राहणार, यावर चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची अधिकृत घोषणा अजून झालेली नसली तरी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आपापसातील राजकीय डावपेच आखले जात असून जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे. निवडणुका जवळ आल्यावर अनेकांना अचानक जनतेची आठवण येते, हे चित्र पुन्हा दिसून येत आहे.
मात्र, कायम लोकांसोबत राहणारे, अडचणीच्या वेळी मदतीला धावणारे आणि विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या काळात तयार होणाऱ्या वातावरणावर न भुलता मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी भावना सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.