Gunaratna Sadavarte : बुधवारी एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलमधील संचालकांमध्ये बैठक सुरू असताना जोरदार वादविवाद झाला आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले. या प्रकरणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बैठकीदरम्यान अपमानास्पद भाषा, भ्रष्टाचाराचे आरोप, आणि सर्वात गंभीर म्हणजे महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदावर्ते गटाने यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या काही संचालकांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचं गांभीर्य लक्षात घेता संबंधित घटनेवर आता गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः खुलासा करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सदावर्ते म्हणाले "आमच्या बहिणींवर अत्याचार सहन करणार नाही"
गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "काल काही व्यक्तींनी लैंगिक शोषणापर्यंतची हिंमत दाखवली. आमच्या लाडक्या बहिणींना वाईट भाषेत बोललं गेलं, अश्लील इशारे करण्यात आले. यामध्ये एक महिला मराठा समाजातील आहे, दुसरी वंजारी समाजातील तर तिसरी आदिवासी समाजातून आहे. आम्ही त्या तिघींच्या सन्मानासाठी आणि संरक्षणासाठी उभे राहिलो आहोत."
सदावर्ते यांनी यावेळी हेही नमूद केले की, संबंधित प्रकरणी पोलिसांत एफआयआर दाखल झाला असून, त्यात गुन्ह्यांची गंभीर कलमं लावण्यात आली आहेत.
"एफआयआरमधील कलमानुसार आरोपींना ७ वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते," असंही ते म्हणाले.
घटनेत सहभागी व्यक्तींची नावे आणि सत्कार
या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी संदीप काटकर, मनोज मुदलियार, दत्ता खेडकर, श्रीहरी काळे, राजेश पानपाटील, संध्याताई दहिफळे, अजित मगरे आणि अतुल सीताफराव या त्यांच्या पॅनलमधील सहकाऱ्यांचा विशेष उल्लेख केला. त्यांनी या सर्वांचा बैठकीनंतर सत्कार केला असल्याची माहिती दिली.
एसटी बँकेच्या बैठकीत झालेला राडा केवळ राजकीय कुरघोडीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो महिला सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा आणि कायद्याच्या चौकटीत गेलेला गंभीर मुद्दा बनला आहे. सदावर्ते यांची प्रतिक्रिया यामध्ये एक सामाजिक भूमिका अधोरेखित करते. आता यापुढे पोलीस तपास आणि कायदेशीर प्रक्रिया कशी पुढे जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.