पुण्यात "कधी काय होईल सांगता येत नाही" हे वाक्य पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. कारण, आज आखाड्याचा शेवटचा रविवार असताना शहरातील चिकन-मटन दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र यावेळी या गर्दीचं कारण वेगळंच होतं. कारण धनोरी परिसरात तब्बल 5000 किलो मोफत चिकन वाटप करण्यात येत होतं. हे चिकन वाटप धनंजय भाऊ जाधव फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून, या उपक्रमामागे पुजाताई जाधव यांचा पुढाकार होता. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आल्याची चर्चा आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, चिकन देताना प्रत्येक व्यक्तीकडून ओळखपत्राची तपासणी करण्यात आली. त्यामुळे केवळ धनोरी परिसरातील रहिवाशांनाच या मोहिमेचा लाभ मिळाला. पुजाताई जाधव म्हणाल्या, "लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन भरून आलं. एवढा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबांना थोडा का होईना आधार मिळावा हीच आमची भावना होती."
आगामी निवडणुका लक्षात घेता अनेक राजकीय नेते आता जनसंपर्क वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे राजकीय वातावरण तापू लागल्याचं बोललं जात आहे. काहींनी यावर टीका केली असली तरी, स्थानिक पातळीवर या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद मात्र लक्षणीय ठरला आहे. धनोरीसारख्या परिसरात अशा स्वरूपाच्या मोफत वाटप मोहिमा नेमक्या कोणत्या हेतूनं राबवण्यात येत आहेत, यावर राजकीय तज्ज्ञ देखील लक्ष ठेवून आहेत.