थोडक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस
डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याबद्दल मोदींनी सोशल मीडियावरुन मानले ट्रम्प यांचे आभार
(PM Modi Birthday) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75वा वाढदिवस आहे. या निमित्ताने विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतचदेशासह जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहे. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोनकरुन शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरुन याची स्वत: माहिती दिली.
या संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी अमेरिकेने घेतलेल्या पुढाकारांना पंतप्रधान मोदींनी पाठिंबा दर्शवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याबद्दल सोशल मीडियावरुन ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, "माझ्या मित्रा, राष्ट्रपती ट्रम्प, माझ्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या फोन कॉल आणि हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याप्रमाणेच, मी देखील भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी तुमच्या पुढाकाराला आम्ही पाठिंबा देतो"
यादरम्यान, दोन्ही देशांमधील व्यापार करारावरही चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या बैठका सुरू असून अलीकडील सात तासांच्या चर्चेला सकारात्मक ठरवण्यात आले आहे. भारतीय वाणिज्य मंत्रालयाच्या मते, द्विपक्षीय व्यापाराला गती देण्यासाठी आणि व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू ठेवण्याचे ठरले आहे.
गेल्या आठवड्यात मोदी आणि ट्रम्प यांच्यातील ही दुसरी चर्चा ठरली. ट्रम्प यांनी अलीकडे भारताला "महान देश" म्हणत नेहमीच मोदींचे मित्र राहतील, असे सांगितले आहे. त्यामुळे पूर्वीच्या व्यापार तणावानंतर आता भारत-अमेरिका संबंध अधिक सकारात्मक दिशेने जात असल्याचे दिसत आहे.