Donald Trump Vs India : डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असून यामुळे भारताला मोठा फटका बसू शकतो. काही दिवसांपूर्वी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून त्यांनी आर्थिक धक्का दिला होता. आता मात्र याहून गंभीर परिणाम करणारा निर्णय ते घेऊ शकतात. तो म्हणजे H1B व्हिसा प्रणालीवर मोठे निर्बंध घालणे अथवा ती पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सलग निर्णय घेत जागतिक अर्थव्यवस्थेला हादरे देत आहेत. आता जर त्यांनी H1B व्हिसा बंद केला तर सर्वाधिक फटका भारतीय कामगारांना बसेल. अमेरिकेतील आयटी कंपन्या, आरोग्य क्षेत्र तसेच संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.
H1B व्हिसा हा अमेरिकेत परदेशी कौशल्याधारक कामगारांना घेऊन जाणारा प्रमुख मार्ग आहे. 1990 मध्ये सुरू झालेल्या या व्हिसामुळे अमेरिकन कंपन्यांना विशेष व्यवसायांमध्ये परदेशी नागरिकांना कामावर ठेवण्याची परवानगी मिळते. साधारणपणे हा व्हिसा तीन वर्षांसाठी दिला जातो आणि नंतर सहा वर्षांपर्यंत वाढवता येतो. दरवर्षी सुमारे 65 हजार H1B व्हिसा जारी केले जातात. याशिवाय अमेरिकन विद्यापीठांतून उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी 20 हजार व्हिसा दिले जातात. भारतातील अभियंते, डॉक्टर, संशोधक आणि विशेषतः आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ या व्हिसावरून मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत जातात.
मात्र अलीकडेच एका अधिकाऱ्याला H1B व्हिसा मिळवण्यासाठी लाच देण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर हा मुद्दा नव्या वादात सापडला. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन नेते जेडी व्हान्स यांनी आरोप केला की, मोठ्या टेक कंपन्या अमेरिकन नागरिकांना नोकरीतून कमी करून त्यांच्या जागी H1B व्हिसाधारक परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर घेतात. हा अमेरिकन नागरिकांवर अन्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच दरम्यान ट्रम्प यांनी “अमेरिका फर्स्ट” या धोरणाची पुनरुज्जीवन करत अमेरिकन नागरिकांनाच नोकरीत प्राधान्य दिले जाईल असे म्हटले आहे. त्यामुळे भारतीय व्यावसायिकांच्या धडधडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प सरकार H1B लॉटरी बंद करून त्याऐवजी पगारावर आधारित प्राधान्य प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे. याचा अर्थ जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य मिळेल.
भारतीय युवक मोठ्या संख्येने अमेरिकेतील आयटी, हेल्थकेअर आणि संशोधन क्षेत्रात काम करत आहेत. त्यामुळे H1B व्हिसाच्या नियमांमध्ये बदल झाला तर किंवा हा व्हिसा रद्द झाला तर लाखो भारतीय कामगारांसाठी हा मोठा धक्का ठरेल. टॅरिफनंतर भारतासाठी अमेरिकेकडून मिळणारा हा दुसरा मोठा आघात असेल, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.