भाजपच्या प्रचार सभेसाठी आलेल्या महिला उन्हात बसल्याचं दिसताच राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले. कमी बजेट असल्याचं सांगत आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसवू नका, मी स्टार प्रचारक आहे, तुम्ही खर्चाची चिंता करू नका असं बावनकुळे म्हणाले. मी राज्यावर आहे, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ असंही ते म्हणाले. गडचिरोलीत भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार सभा पार पडली. यावेळी काहीजण उन्हामध्ये बसल्याचं दिसून आलं. तेव्हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचत मंडप पूर्ण नाही टाकला, याबाबत विचारणा केली.
आयोगाला मी खर्चाचा हिशोब देतो
निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका. तुम्ही एक मंडप टाकला तर आपण तो 50 रुपयाचा असल्याचं सांगू. मी स्टार प्रचारक आहे. कशाला हिशोब लागतो? मी राज्यावर आहे, राज्यात आम्ही हिशेब देऊ. मात्र आमच्या लाडक्या बहिणी उन्हात बसवू नये असे म्हणत बावनकुळेंनी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले.
काँग्रेस ही किंचित पार्टी राहील
काँग्रेसवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "एका कार्यकर्त्याने काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. कारण सांगताना तो म्हणाला की, विजय वडेट्टीवार हे नाना पटोले यांचं तोंड बघायला तयार नाहीत. नाना पटोले हे विजय वडेट्टीवार यांचं तोंड बघायला तयार नाहीत. दोघेही मिळून सुनील केदार यांचं तोंड पाहायला तयार नाहीत. तिघेही मिळून यशोमती ठाकूर यांना विचारत नाहीत. चौघेही मिळून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही विचारत नाहीत आणि पाचही जण मिळून राहुल गांधींना विचारत नाहीत. काँग्रेस पक्षात मोठा विसंवाद आहे. 2029 पर्यंत काँग्रेस पार्टी ही किंचित पार्टी राहिल. काँग्रेस पार्टी नेतृत्वहीन झाली आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही."