भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मतदार याद्यांतील घोळाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात राणे यांनी राज ठाकरेंवर सरळ निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरे अभ्यासू नेते आहेत, पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली आहे. त्यांनी लोकसभेनंतर असे आरोप का केले नाहीत?”
नितेश राणे यांनी वाढवण बंदर प्रकल्पाचे समर्थन करताना सांगितले की, “या प्रकल्पामुळे 12 लाख तरुणांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे, मग तो वाईट कसा ठरतो?” त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा दाखला देत राज ठाकरेंना इतिहास समजून घेण्याचा सल्ला दिला. अदानींच्या प्रकल्पांवरूनही त्यांनी टीका करत म्हटलं, “अदानींचे मातोश्रीवरचे फोटो आहेत, मग आता हिंदू मतदारांची यादी तपासताना मालेगाव, भायखळा आणि नळ बाजारात कधी जाणार?” त्यांनी पुढे विचारलं की, “अबू आझमींच्या कानाखाली का दिली नाही? मानखुर्द आणि शिवाजी नगरमधील बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना बाहेर काढण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.”
राणे यांनी राज ठाकरेंना थेट उद्देशून म्हटलं, “राज साहेबांनी उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नये, ते वाया गेलेले मतदार आहेत. उद्या आम्ही हाजीअलीला जाऊन हनुमान चालीसा म्हटलं तर चालेल का? वातावरण कोण बिघडवतंय, हे सगळ्यांना दिसत आहे.” ते पुढे म्हणाले की, “मतदार याद्या मोहल्ल्यावर जाऊन तपासा, कारण लोकांना चुकीच्या माहितीवर भुलवलं जातंय.” त्यांनी सूचित केलं की राज ठाकरे यांचा लक्ष मुद्द्यांवर न राहता हिंदू-मुस्लिम मतदारांमध्ये भेद निर्माण करण्यावर आहे.
महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीबद्दल बोलताना राणे म्हणाले की, “जर लढत मैत्रीपूर्ण असेल, तर त्याचा फायदा महायुतीलाच होईल. मात्र, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठाकडे उमेदवारच नाहीत,” असा जोरदार टोला त्यांनी लगावला. या वक्तव्यांमुळे राज ठाकरे आणि नितेश राणे यांच्यातील जुना राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.