बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत ज्या नागरिकांची नावे महानगरपालिका मतदार यादीत नोंदणीकृत आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार आणि हक्क आहे. मतदारांना मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी निवडणूक प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.महानगरपालिका मतदार यादीतील मतदारांचे नाव, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचे ठिकाण यासंबंधी माहिती असलेल्या मतदार चिठ्ठ्यांचे घरोघरी वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांना आपले मतदान केंद्र सहजपणे शोधता येणार आहे. प्रशासनाकडून नागरिकांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान केंद्रावर मतदार छायाचित्र ओळखपत्र (Voter ID) दाखवल्यानंतर मतदान करता येईल. मात्र, जर एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार ओळखपत्र उपलब्ध नसेल, तर घाबरण्याचे कारण नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 11 पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, हा या निर्णयामागील उद्देश आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेची गोपनीयता आणि शिस्त राखण्यासाठी मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी आपले मोबाईल फोन मतदान केंद्राच्या बाहेर, स्वतःच्या जबाबदारीवर ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
मतदानासाठी ग्राह्य ओळखपत्रांची यादी
1. मतदान ओळखपत्र
2. पासपोर्ट
3. आधारकार्ड
4 ड्रायव्हिंग लायसन्स.
5. पॅन कार्ड
6. सरकारी कर्मचाऱ्यांचे फोटोसहित ओळखपत्र
7. राष्ट्रीयकृत बँक अथवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक
8. सक्षम प्राधिकरणांनी दिलेले फोटोसहित अपंगत्वाचे प्रमाणपत्र
9. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड
10. फोटो असलेलं पेन्शन कार्ड
11. स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र
निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा कर्मचारीवर्ग, पोलीस बंदोबस्त आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि गर्भवती महिलांसाठी विशेष सोयी करण्यात आल्या असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने सर्व मतदारांना सकाळी लवकर मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. एका मतामुळेही लोकशाही मजबूत होते, त्यामुळे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.