Madhav Gadgil Passed Away : निसर्ग आणि पर्यावरण जपण्याचा सतत संदेश देणारे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन झाले आहे. अल्प आजाराने पुण्यातील रुग्णालयात बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आज त्यांच्या पाषाण परिसरातील निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने पर्यावरण संवर्धनासाठी आयुष्य वाहून घेतलेली एक महत्त्वाची व्यक्ती आपण गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
डॉ. गाडगीळ यांनी संपूर्ण आयुष्य निसर्ग अभ्यासासाठी दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाने २०२४ मध्ये त्यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा मानाचा पुरस्कार दिला होता. याशिवाय पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले होते.
पश्चिम घाटातील जैवविविधतेवर त्यांनी दीर्घकाळ संशोधन केले. विकास प्रकल्पांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानावर त्यांनी सखोल अभ्यास मांडला. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून शेकडो संशोधन लेख जगभरातील नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. निसर्गासाठी आवाज उठवणारा एक अभ्यासू मार्गदर्शक आज कायमचा शांत झाला आहे.