शहरात वाढत्या अपघातांच्या मालिकेत आणखी एक गंभीर घटना शनिवारी रात्री घडली. केशवनगर परिसरात वाहतूक विभागाचे उपआयुक्त (डीसीपी) हिम्मत जाधव यांच्या अधिकृत वाहनाला मद्यधुंद चालकाने जोरदार धडक दिली. रात्री साधारणपणे दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या धडकेत गाडीची एक बाजू चक्क दबली. एअरबॅग्स उघडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, जाधव यांच्या मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनीही मद्यधुंद वाहनचालकाविरोधात संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहनचालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, रक्तातील अल्कोहोलची पातळी तपासली जात आहे. पोलिसांनी 'ड्रिंक अँड ड्राईव्ह' कलमानुसार गुन्हा दाखल केला असून कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.
या अपघातामुळे पुन्हा एकदा शहरातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांकडून दररोज नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अशा वाहनचालकांवर अधिक कठोर मोहिमा हाती घेण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.