दिवाळीच्या निमित्ताने मिठाईच्या तुलनेत ड्रायफ्रुट्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मुंबई APMC मसाला मार्केटमधून ड्रायफ्रुट्सचा पुरवठा होत असताना, काही भेसळखोरांनी याचा फायदा घेत भेसळयुक्त ड्रायफ्रुट्स विक्री सुरू केली आहे. APMC मार्केटमधील G, H, L विंग्समध्ये ड्रायफ्रुट्समध्ये अनधिकृतपणे भेसळ केली जात आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. मणुक्याला रासायनिक द्रावणाने धुतले जाते आणि त्यावर रंग आणि पावडर टाकून ते आकर्षक बनवले जातात. त्यानंतर हे ड्रायफ्रुट्स फ्लेवर व आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात विकले जातात.
तसेच, काजू आणि बदामाचे प्रोसेसिंग सुद्धा अशाच प्रकारे होत असल्याचे दिसते. जमिनीवर उघड्यावर ड्रायफ्रुट्स साठवले जात आहेत आणि स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजार समितीचे अधिकारी आणि अन्न औषध प्रशासनाच्या "आशीर्वादाने"च हा गोरखधंदा सुरू आहे. लाचखोरीमुळे कारवाई टाळली जात आहे, असे आरोप आहेत.
सध्या ड्रायफ्रुट्सचे दर 500 ते 2270 रुपये किलोपर्यंत आहेत. फ्लेवर आणि पॅक केलेले ड्रायफ्रुट्स त्याहून महाग विकले जात आहेत. दिवाळीच्या खरेदीत मिठाईऐवजी ड्रायफ्रुट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या भेसळीची माहिती नाही, आणि यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.