Wardha Suicide Financial Struggles for Education, Sonia Ends Her Life by Hanging : बारावीच्या इयत्तेच्या प्रवेशासाठी पैसे नसल्यामुळे वडिलांनी प्रवेशास नकार दिला त्यामुळे वर्धा तालुक्यातील सोनिया वासुदेव उईके या 17 वर्षीय मुलीने नैराश्येमध्ये गळफास लावून आपले जीवन संपवले. वर्धा तालुक्यातील लोणसावळी येथील ही घटना असून या घटनेमुळे वर्धा तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
वर्धा तालुक्यात वासुदेव उईके आपल्या कुटुंबासमवेत लोणसावळी पुलगाव पोलीस स्टेशन परिसरात राहतात. सोनिया वर्धेच्या न्यू इंग्लिश या महाविद्यालयात कॉमर्स विभागात अकरावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या घरी परतली होती. अकरावीपर्यंत सोनिया वसतिगृहामध्ये राहत होती. तिला बारावीच्या प्रवेशासाठी पैशांची गरज होती. याबाबत तिने वारंवार आपल्या वडिलांकडे तशी मागणी केली.
मात्र वडील हे मोलमजुरी करणारे होते. बरेच दिवस त्यांच्याकडे काम नसल्यामुळे त्यांच्याकडे पैशांची चणचण होती. तिने तिच्या भावाकडेही याबाबत विचारणा केली असता भावानेही दुर्लक्ष केले. यामुळे ती खूप टेन्शनमध्ये होती. आपला अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकणार नाही या कारणामुळे ती मानसिकरीत्या खचली. त्यातच तिने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले. काही दिवसांनी मी पैशांची व्यवस्था करतो असे तिच्या वडिलांनी तिला आश्वासन दिले होते. मात्र तिला वडील आपल्याला पैसे देतील असा विश्वास वाटत नव्हता. त्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
घरातील बाथरूमच्या टिनच्या अँगलला गळफास लावून सोनियाने आपले जीवन संपवले. जेव्हा तिचे वडील आणि भाऊ कामावरून आले तेव्हा त्यांना हे दृश्य दिसले. या प्रकरणात आकास्मिक मृत्युंची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.