थोडक्यात
उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना महायुती सरकारवर तिखट शब्दात हल्ला चढवला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत त्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला.
सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीविषयीच्या आश्वासनाचा तो व्हिडीओ थेट उपस्थितांना दाखवला.
मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना महायुती सरकारवर तिखट शब्दात हल्ला चढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत त्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला.
सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीविषयीच्या आश्वासनाचा तो व्हिडीओ थेट उपस्थितांना दाखवला. “तेव्हा म्हणत होते सातबारा करणार कोरा कोरा कोरा… मग आता कुठे गेला चोरा चोरा चोरा?”, असा बोचरा सवाल त्यांनी फडणवीसांना उद्देशून केला. “मतचोरी करून सत्तेत आला, आता कुठे लपलात?” असा आणखी एक फटका त्यांनी लगावला.
शेतकऱ्यांच्या वेदना, एकच मागणी : कर्जमाफी
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी तुमच्याकडे हिम्मत वाढवायला आलोय. तुमच्या आशीर्वादाने मी कर्जमाफी केली होती. पण आता शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही, तर पैसा गेला कुठे? उन्हात, पावसात, वाऱ्यात, थंडीत शेतकरी मरमर मरतोय. शेतकरी भीक मागत नाही, मेहनतीचं अन्न पिकवतो.”
यावेळी त्यांनी पुन्हा फडणवीसांचा ऑडिओ क्लिप ऐकवून शेतकऱ्यांना विचारलं
“कर्जमाफी करणार, असं म्हणाले होते ना? मग आता विलंब कशाला?” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोमणा मारतात, अशी टीका करत उद्धव म्हणाले, “लाडक्या बहिणींना पैसे मिळाले की नाही? मिळाले! मग शेतकऱ्यांचं काय? इथे शेतकरी मेला तरी चालेल पण कॉन्ट्रॅक्टर जगला पाहिजे, असा प्रकार सुरू आहे.
‘तुम्ही फिरलात, तरी शेतकरी शिव्या घालतोय! का?’
स्वतःवर केलेल्या टीकांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मलाच म्हणतात की मी घरात बसतो. पण मी घरी बसून महाराष्ट्र वाचवला, कर्जमाफी केली. आणि तुम्ही फिरता पण शेतकरी तुमच्यावर चिडतोय, शिव्या घालतोय. याचं उत्तर द्या! आनंदाचा शिधा, शिव भोजन बंद; आणि स्वतःची दुकानं मात्र चालू!” असा तिरकस कटाक्ष त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे टाकला.
‘ही खोटी, निर्दयी माणसं’
उद्धव ठाकरेंनी अजित पवारांचीही क्लिप ऐकवली ज्यात ते पीककर्जाच्या मुदतीबाबत बोलताना दिसत होते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव म्हणाले, “ही खोटी, निर्दयी माणसं आहेत. यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळणारच नाहीत.” यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना थेट आवाहन केलं, “जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, पीकविमा मिळत नाही, हेक्टरी 50 हजार मिळत नाही तोपर्यंत महायुतीला एकही मत नाही!”
‘तुम्ही शेतकऱ्यांत या, संवाद साधा!’
मुख्यमंत्री स्वतःला लोकांत गेल्याचा दावा करतात यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “मी तर शेतकऱ्यांत आहेच. पण तुम्ही या आणि संवाद साधून दाखवा! शेतकऱ्यांनी सरकारचा भ्रमाचा भोपळा आणि टरबूज फोडला आहे. जात-पात-धर्म बाजूला ठेवा आणि एकजूट व्हा,” असे आवाहनही त्यांनी केले. उपमुख्यमंत्री पद हे असंवैधानिक असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्ला चढवला.