मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज चौथ्या दिवशी पोहोचले असून राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. आंदोलकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना जेवण आणि आवश्यक सोयी-सुविधांची जबाबदारी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.
शिवसेनेकडून दररोज किमान 10 हजार आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्याची तयारी केली जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 1 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी असून जितकी गरज असेल तितकेच ताजे जेवण तयार करून पुरवले जाणार आहे. गेल्या 2 दिवसांपासून आंदोलकांसाठी दुपारचे आणि संध्याकाळचे जेवण तसेच नाश्त्याची सोय सुरू आहे.
याशिवाय, बाहेरूनही मोठ्या प्रमाणात जेवण येत असल्याने पुरवठा नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असेपर्यंत ही मदत सुरू राहील, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, आमदार सुनिल प्रभु यांच्या पुढाकारातून आंदोलकांना मदत पोहोचवण्यात आली आहे. यामध्ये 25 गोणी तांदूळ, 5 गोणी डाळ, 2500 पाण्याच्या बाटल्या आणि इतर आवश्यक साहित्य पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आझाद मैदानावर जमलेल्या मराठा बांधवांना जेवण व पाण्याची कमतरता भासू नये, याची काळजी घेतली जात आहे.