आज मुंबईमधील वरळी डोम येथे मनसे पक्षाचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे (उबाठा) उद्धव ठाकरे हे मराठीच्या अस्मितेसाठी अखेर 20 वर्षांनंतर एकत्र आले. मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी भाषा जपण्यासाठी भांडणे महत्वाची नसून महाराष्ट्र महत्वाचा आहे असे वक्तव्य करत आज राज ठाकरे यांनी सभा गाजवली.
राज ठाकरे यांनी आज सरकारवर निशाणा साधत मराठीचा मुद्दा अधोरेखित केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "आमची मुले इंग्रजीमध्ये शिकली, माझे वडील माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे इंग्रजीत शिकले मात्र त्यांच्या मराठी भाषेच्या प्रेमावर तुम्ही शंका घेणार का? लालकृष्ण अडवाणी मिशनरी शाळेत शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न घेणार का? बाळासाहेब ठाकरे इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रे काढत होते, मात्र त्यांनी कधी मराठीच्या अभिमानाबाबत तडजोड नाही केली".
"मराठी अस्मिता नेहमी त्यांनी जपली आणि हे आपल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला ठाऊकच आहे. मराठी भाषेबद्दल प्रेम हे आतून असाव लागत. आपण कोणत्याही भाषेतून शिकू मात्र एखाद्या गोष्टीबद्दल अभिमान हा आपल्या आतून असावा लागतो आणि तो आमच्यात आहे. उद्या मी हिब्रू भाषा शिकून आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगेल तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे?", असा खडा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी विरोधकांना विचारला. यावेळी राज ठाकरे यांनी इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते किती आहेत याची थोडक्यात यादी वाचून दाखवली.