माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळणे आणि 'शासन भिकारी आहे' या वक्तव्यावर कोकाटेंना मोठ्याप्रमाणात निशाण्यावर धरण्यात आलं. याप्रकरणामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरुन ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.
याचपार्शवभूमीवर आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक होण्यापुर्वी माणिकराव कोकाटेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची अँटी चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. अजित पवार, माणिकराव कोकाटेंमधील बैठक संपली असून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
अजित पवार आणि कोकाटेंमधील ही बैठक अर्ध्या तासांहून अधिक काळ सुरु होती. अजित पवारांसोबतच्या बैठकीत कोकाटेंकडून त्यांनी केलेल्या कृत्यावर आणि वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. भविष्यात अशी वक्तव्ये करणार नाही अशी हमी कोकाटेंनी यावेळी दिली. त्याचसोबत बोलताना भान ठेवायला पाहिजे, तुमच्यामुळे सरकार बदनाम होतंय, असं म्हणत अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले.