सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला आज, रविवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. हा कारखाना उस्मानभाई यांचा असल्याचे समजते. या आगीत 8 निष्पापांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आगीनं एक वर्षाच्या चिमुकल्याचाही बळी घेतला आहे. त्या चिमुकल्यानं आईच्या कुशीतच जीव सोडल्याची घटना समोर आली आहे. बचावासाठी बेडरुममध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनाही आईच्या कुशीतलं बाळ पाहून गहिवरुन आलं होतं.
आगीपासून बचाव करण्यासाठी जिवाच्या आंकातेने, मंसुरी कुटुंबीय वरच्या मजल्यावरील बेडरुममध्ये गेले. पण, काळ बनून आलेल्या आगीत होरपळून उस्मानभाईंच्या कुटुंबीतील 5 जणांसह कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू झाला. या आगीत उस्मानभाईचा नातू, मुलगा, सून अख्ख कुटुंबच संपलं. निदान आपलं बाळं तरी वाचेल म्हणून आईनं एक वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत ठेवलं. परंतू आईसह चिमुकल्यानेही आईच्या कुशीतच जीव सोडला. बचावासाठी बेडरुममध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनीही आईच्या कुशीतलं बाळ पाहिल्यावर तेही सुन्न झाले.
या भीषण आगीत आतापर्यंत एकूण 8 जणांचा मृत्यू या घटनेत झाला आहे. त्यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मंसूरी (वय 87), अनस मंसूरी (वय 24), शीफा मंसूरी (वय 22), युसुफ मंसूरी (वय 1 वर्ष), आयेशा बागवान (वय 38), मेहताब बागवान (वय 51), हिना बागवान (वय 35), सलमान बागवान (वय 38) असे होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.