"‘भगवा आतंकवाद’ किंवा ‘भगवा दहशतवाद’ असे आरोप करणाऱ्यांनी केवळ हिंदुत्वाचाच नव्हे, तर संपूर्ण सनातन संस्कृतीचा अपमान केला आहे. या गंभीर आरोपांमागे तत्कालीन काँग्रेस सरकारचे एक मोठे कटकारस्थान होते," असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात झालेल्या तपासाविषयी बोलताना शिंदे म्हणाले, “प्रज्ञा ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव या प्रकरणात घ्यावं म्हणून अत्याचार झाला, टॉर्चर करण्यात आलं. इतकंच नाही तर एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने देखील असं सांगितलं आहे की, त्याच्यावर दबाव आणून सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव या खटल्यात घ्यायला सांगितलं गेलं. हे अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे.”
शिंदे पुढे म्हणाले,
"ही घटना खरं म्हणजे काँग्रेसच्या मानसिकतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. काँग्रेसने नेहमी हिंदुत्व, सनातन धर्म आणि भगवा या सगळ्यांचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला. त्यांनी मतांसाठी हिंदुत्वाला टार्गेट केलं. या सगळ्या प्रकारामागे एक मोठं राजकीय षडयंत्र होतं आणि त्याचा पर्दाफाश आता होत आहे.”
ते पुढे म्हणाले,
"तपास यंत्रणांवर दबाव टाकणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यातून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झालंच पाहिजे. यामागचा खरा चेहरा, म्हणजेच तत्कालीन काँग्रेस सरकार आणि यूपीएतील राज्यकर्ते, जनतेसमोर आले पाहिजेत."
प्रज्ञा ठाकूर यांनी नुकताच दावा केला होता की, "मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मला जबरदस्तीने नरेंद्र मोदी यांचं नाव घ्यायला लावण्यासाठी छळ करण्यात आला होता." याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत काँग्रेसवर टीका केली.
"मोहन भागवत, नरेंद्र मोदी हे देशभक्त नेते आहेत. त्यांच्यासारख्या लोकांना गुन्ह्यांत गोवून भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा प्रयत्न म्हणजे देशविरोधी कारस्थान होतं. यातून काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे," असंही शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.
तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या 'सनातन टेरर' या विधानावरही शिंदे यांनी टीका करत म्हटलं की, “हिंदू धर्म, सनातन धर्म कधीच अन्याय करत नाही. तो सहिष्णू आहे, तो सहन करणारा आहे. त्याच धर्माचा अपमान काँग्रेस नेते करत आहेत आणि याची त्यांना किंमत चुकवावी लागेल.”
शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की,
"हा केवळ राजकीय आरोप नाही, तर हिंदू समाजाच्या श्रद्धेवर झालेला घाव आहे. काँग्रेसने या प्रकारासाठी संपूर्ण हिंदू समाजाची आणि देशाची माफी मागावी."
दरम्यान, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध करत युवासेनेकडून आंदोलन छेडण्यात आलं असलं, तरी ठाकरे गटाकडून यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया अद्याप आली नसल्याची नोंद उपमुख्यमंत्र्यांनी घेतली.