मुंबईत आज नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने वरळी कोळीवाड्यातील बत्तेरी जेट्टी येथे समुद्राला नारळ अर्पण करण्याचा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे आमने-सामने आले. दोन्ही नेत्यांना पाहण्यासाठी कोळी बांधवांची मोठी गर्दी जमली होती.
कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा एक अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. सकाळपासूनच बत्तेरी जेट्टी परिसरात सणासुदीचे वातावरण होते. आदित्य ठाकरे कोळी बांधवांसोबत नारळ समुद्राला अर्पण करण्यासाठी आले होते. त्याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या सोहळ्यात सहभागी झाले. दोन्ही नेत्यांचे कोळी बांधवांनी स्वागत केले.
कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदे निघत असताना आदित्य ठाकरे त्यांच्या समोर आले. दोन्ही नेते एकमेकांच्या अगदी काही फुटांच्या अंतरावरून गेले. गर्दीत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि कोळी बांधवांनी या क्षणाला उत्साहाने अनुभवले. सणाच्या वातावरणात जरी दोघांची भेट झाली, तरी राजकीय पार्श्वभूमीमुळे या भेटीला वेगळेच रंग चढले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आज नारळी पौर्णिमेचा उत्साह आहे, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. कोळी बांधव आणि बहिणी एकत्र येऊन हा सण साजरा करत आहेत. कोळीवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ही राज्य सरकारची भूमिका आहे.”
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची संधीही सोडली नाही. नुकत्याच दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे शेवटच्या रांगेत बसलेले दिसल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “जे स्वाभिमान गहाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, त्यांना त्याचं काही वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली असेल.” सणाच्या निमित्ताने झालेल्या या आमनेसामनेच्या क्षणामुळे वरळी कोळीवाड्यात सणासोबतच राजकारणाचाही माहोल रंगला