महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विविध ठिकाणी युती आणि आघाड्यांचे गणित बदलताना दिसत असून, काही ठिकाणी भाजपला तर काही ठिकाणी शिंदे गट किंवा अजित पवार गटाला बाहेर ठेवून नव्या युती आकाराला येत आहेत. अशाच पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्का देत परस्परांमध्ये युती जाहीर केली आहे.
सोलापुरात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात युतीसाठी चर्चा सुरू होत्या. मात्र जागावाटपावरून या चर्चांना अपेक्षित गती मिळाली नाही. ऐनवेळी झालेल्या या नाट्यमय घडामोडीत शिंदे गटाने भाजपपासून फारकत घेत थेट अजित पवार गटासोबत हातमिळवणी केली. त्यामुळे सोलापुरातील निवडणूक गणित पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात ५१-५१ जागांचा फॉर्म्युला ठरल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “नगरविकास आणि अर्थखात्याची जबाबदारी आमच्या नेत्यांकडे असल्याने निधीची कोणतीही अडचण येणार नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत.”
भाजपसोबतच्या अपयशी चर्चांबाबत बोलताना म्हेत्रे म्हणाले की, “आम्ही भाजपकडे ४० जागांची मागणी केली होती. त्यांनी केवळ ८ जागांची ऑफर दिली. मात्र आम्ही २६ जागांवर ठाम होतो. त्यानंतर पुढील चर्चा झाली नाही.” यानंतर अजित पवार गटासोबत युती करण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या युतीसाठी राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. २७ डिसेंबर रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे . यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर या हालचालींना वेग आला आणि अखेर युतीवर शिक्कामोर्तब झालेआता या नव्या युतीमुळे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.