सध्या महायुतीमधील अनेक नेते हे वादाच्या पिंजऱ्यात अडकले आहेत. अनेक नेत्यांवर राजीनाम्याची टांगती तलवार देखील आहे. त्यात शिंदेच्या शिवसेनेतून मंत्री संजय शिरसाट यांचा पैशांनी भरलेल्या बॅगसोबतचा एक व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.
त्यांचा असा आरोप होता की, त्यांना शिळे आणि खराब अन्नपदार्थ दिलं गेलं होत. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्री योगेश कदम यांच्यावर डान्सबार संबंधीत गंभीर आरोप केले. एवढ सगळ सुरु असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं विरोधकांकडून अधिक जोर धरला गेला.
यासर्व वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया आल्या आहेत. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांजवळ नाराजी व्यक्त केली आहे.
याचपार्शवभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, " योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच काम टीका करून बंद करता येत नाही. दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार? योगेश कदम चिंता करायचं काम नाही, अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहेत" असं म्हणत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं असल्याचा दावा केला आहे.