भारतावर पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री ९ वाजल्यानंतर ड्रोनने हल्ले सुरू करण्यात आले. यानंतर जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरातमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आला. दरम्यान, भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे ड्रोन नेस्तनाभूत केले. तर पाकिस्तानच्या लाहोर, कराची, इस्लामाबादमध्ये प्रतिहल्ले केले. पाकिस्तानच्या या कुरहोड्यांवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "जर तुम्ही जास्त हुशारी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जशास तसे उत्तर मिळेल. भारतीय सैन्याने कोणत्याही नागरिकावर हल्ला केला नाही, तर दहशतवाद्यांना धडा शिकवला. जर पाकिस्तानने भारताविरुद्ध काही केले तर ते त्यांना महागात पडेल. त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. भारत आता एक नवीन भारत आहे. भारत आता घुसून मारेल. जर तुम्ही भारताला इजा पोहोचवली, तर भारत सुद्धा एकेकाला शोधून शोधून मारेल. पाकिस्तानने आपल्या मर्यादेत राहावे. इथे तुमचे खाण्याचे वांदे आहेत. ही पाकिस्तानची कृती आहे, ती त्यांना महागात पडेल. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना धडा शिकवतील. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याला धडा शिकवण्यात आला आहे. त्यांनी धडा शिकला पाहिजे. उद्या, शुक्रवारी सुरक्षेबाबत आमची बैठक आहे. आमचे पोलीस सज्ज आहेत. लोकांना सावध आणि सतर्क करण्यासाठी मॉक ड्रिलदेखील आयोजित केले जात आहेत."