थोडक्यात
लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदेंचे सर्वात मोठे विधान
निवडणुकींच्या पार्श्वभूमीमुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग
कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही
आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीमुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेबद्दल एक मोठे विधान केले आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी मी एकदा शब्द दिला की दिला, मग मी तो पूर्ण करतो, असे ठाम आश्वासन जनतेला दिले. ते ठाणे येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि सांगली येथे बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमात बोलत होते.
ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एक मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय धोरणे स्पष्ट करत विरोधकांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी मागील सरकारच्या कार्यपद्धतीवर थेट टीका केली.
कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही
“या अगोदरचे सरकार हे स्थगिती सरकार होते. मात्र, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासातील सगळे स्पीड ब्रेकर काडून टाकले. विकासाच्या मुद्यावर तुम्ही आलात. त्यामुळे मी शब्द देतो, विकासाच्या कामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शहरातील धोकादायक इमारतींचे कामही सरकार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना शाश्वत आहे. राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असे ठामपणे सांगितले. यामुळे महिला मतदारांना दिलासा मिळाला. यावेळी एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल” असा संदेश त्यांनी नवीन कार्यकर्त्यांना दिला. तसेच विकास म्हात्रे आगे बडो, हम तुम्हारे साथ है” अशी घोषणाही त्यांनी दिली.
एकदा शब्द दिला की तो पाळा
तसेच एकनाथ शिंदे यांनी सांगलीतील बोरगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या भव्य बैलगाडी शर्यत कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वचनपूर्तीच्या धोरणावर विशेष भाष्य केले. “मै एक तो कमिटमेंट करता नाही, और एक बार कमिटमेंट कर दी, तो फिर खुद्द की भी नही सुनता!”, असा थेट एक डायलॉग त्यांनी मारला. यानंतर ते म्हणाले की एकनाथ शिंदे, हा शब्द दिला की शब्द पूर्ण करतो. बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा विचार करा आणि एकदा शब्द दिला की तो पाळा. त्यामुळे मी एकदा शब्द दिला, की माघारी नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.