संपूर्ण राज्यालाच नाही, तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती, तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईतील वरळी येथील डोम सभागृहात राज-उद्धव विजयी मेळावा पार पडला. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळत, शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. 20 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर पाहायला मिळाले. यादरम्यान मराठी भाषेच्या विरोधात जाणाऱ्यांवर राज ठाकरेंची तोफ कडाडलेली पाहायला मिळाली. हा मेळावा झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
"3 वर्षांपुर्वी दौड आला अब उठेगा नहीं साला ही डायलॉग त्यांना शोभून दिसत, मी नाही बोलत. फक्त आम्ही 3 वर्षापुर्वी उठाव केला आम्ही अन्याया विरुद्ध उठलो. ते आडवे झाले 3 वर्षांपुर्वी अजून सावरले नाही, आणि आता कोणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटत त्यांना ते जमत नाही, त्यासाठी मनगटात जोर लागतो. फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही, एकाने मराठीबद्दल असणारी तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असणारी मळमळ दाखवली. कोणताही झेंडा नाही असं म्हणाले होते, ते एकाने पाळलं, आणि दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा तिथे बोलून दाखवला".
मराठी भाषेवरुन बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "मराठीबद्दल बोलायचं तर त्यांनी सुरवात राज्यगीताने केली. ते मी मुख्यमंत्री असताना त्या राज्यगीताला मान्यता दिली होती. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी माणूस बाहेर का फेकला गेला याच उत्तर या दोघांनी द्यावं". असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या विजय मेळाव्यावर उत्तर दिलं आहे.