ताज्या बातम्या

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची नवी राजकीय चाल! कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी ‘दोन दिवसांची’ खास रणनीती

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत अद्याप अस्वस्थता आणि संशयाचे ढग दाटलेले असताना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आता स्वतः हालचाल सुरू केली आहे.

Published by : Varsha Bhasmare

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत अद्याप अस्वस्थता आणि संशयाचे ढग दाटलेले असताना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आता स्वतः हालचाल सुरू केली आहे. कार्यकर्ते आणि आमदार दुसऱ्या पक्षाकडे वळू नयेत, अंतर्गत नाराजी बाहेर फुटू नये आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची पकड मजबूत राहावी—यासाठी शिंदेंनी आखलेली ही ‘नवी खेळी’ राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरत आहे.

शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस त्यांनी पूर्णपणे आपल्या आमदारांसाठी राखून ठेवले आहेत. प्रत्येक विभागातील आमदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी, नाराजी, प्रलंबित कामे आणि स्थानिक स्तरावरील पक्षसंघटनेची स्थिती जाणून घेण्याचा शिंदेंचा मानस आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक केवळ औपचारिक नसून रणनीतिक असल्याचे मानले जाते. अलीकडच्या नगरपंचायत–नगरपालिका निवडणुकांत मित्रपक्षांनीच पदाधिकारी फोडल्याच्या घटनांनी शिवसेना आणि भाजपामध्ये दुरावा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि पक्षात स्थिरता राखणे शिंदेंसमोरचे मोठे आव्हान आहे.

याच दरम्यान, मुंबई महापालिकेच्या तयारीलाही गती दिली जात आहे. पश्चिम उपनगरातील महत्वाच्या 12 ते 15 जागांची जबाबदारी प्रकाश सुर्वे, मुरजीकाका पटेल आणि दिलीप मामा लांडे या तीन आमदारांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मुंबईत नव्याने उभ्या राहत असलेल्या शक्तिसंतुलनात या त्रिकुटाची भूमिका निर्णायक ठरू शकते, असा विश्वास शिंदेंना आहे.

पण दुसरीकडे, देवगिरीवरील बैठकीत शिवसेनेच्या आमदारांची नाराजी उफाळून आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उल्लेख करत काही आमदारांनी कार्यकर्ते फोडण्याच्या तक्रारींना आवाज दिला. सिंधुदुर्ग, मालवण, रायगड, पालघर, कल्याण–डोंबिवली या भागांत ‘ऑपरेशन लोटस’ सुरूच असल्याच्या तक्रारी शिंदेंसमोर मांडल्या गेल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुतीच्या धर्मापेक्षा पक्षातील अस्तित्व अधिक धोक्यात आहे, अशी भावना काही शिवसेना आमदारांमध्ये दिसत आहे.

शिंदेंसमोरचे आव्हान आता द्विगुणित झाले आहे, एकीकडे भाजपाशी समन्वय ठेवत महायुतीची एकता जपणे आणि दुसरीकडे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करून पक्षाची अंतर्गत बांधणी मजबूत करणे. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी संख्या आणि रणनीती दोन्ही महत्त्वाच्या आहेत, हे शिंदेंना ठाऊक आहे. त्यामुळेच शुक्रवार–शनिवारच्या या प्रत्यक्ष भेटी हा केवळ कार्यक्रम नसून आगामी राजकीय समीकरणांची बीजे पेरणारा निर्णायक टप्पा ठरू शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा