राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा अंतिम टप्पा गाठत असून, संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. मतदानाच्या काही तासांवर प्रचाराला प्रचंड वेग आला आहे. पक्ष नेते, स्थानिक उमेदवार आणि कार्यकर्ते घराघरांत भेटीद्वारे, सभा – रॅली – पदयात्रा यांद्वारे मतदारांना पटवून देण्यासाठी आक्रमक झाले आहेत.
सोमवार, 1 डिसेंबर 2025 ही प्रचाराची अखेरची मुदत असून, रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करण्याची मुभा आहे. त्यामुळे आज रविवार असल्याने अनेक राजकीय पक्षांनी 'सुपर संडे' म्हणून प्रचाराचा धडाका लावला आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या सभा, रोड शो आणि जाहीर भेटीगाठी घेतल्या जात आहेत. येत्या काही तासात प्रचाराची सांगता होणार असल्याने प्रत्येक उमेदवाराला हा शेवटचा दिवस निर्णायक मानला जात आहे. मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क वाढवण्यासाठी विविध नव्या पद्धती वापरल्याचेही दिसत आहे.
या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील विकासाचे मुद्दे, पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि स्थानिक कर यांसारखे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे नागरिकही जागरूकपणे प्रचार ऐकत आहेत.सोमवारी रात्री 10 वाजता प्रचाराची अधिकृत सांगता होणार असून, पुढील दोन दिवसांत मतदानासाठी शहरांमध्ये सज्जता सुरू होणार आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने ही निवडणूक अत्यंत हुरहुरीची ठरणार आहे.