मतदानानंतर बोटावर लावलेली खूण पुसून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न होणे चुकीचे असून असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. बोटावरील खूण काढली तरी संबंधित व्यक्तीला पुन्हा मतदान करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आयोगाने मांडली आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, प्रत्येक मतदाराने मतदान केल्यानंतर त्याची अधिकृत नोंद घेतली जाते. त्यामुळे केवळ शाई किंवा मार्कर पुसून पुन्हा मत टाकणे शक्य नाही. याबाबत सर्व मतदान कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदारांच्या बोटावर खूण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मार्कर पेनबाबत आयोगाने स्पष्ट केले की, हा प्रकार नवीन नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक वर्षांपासून याच पद्धतीचा वापर केला जात आहे. बोटाच्या नखावर आणि आजूबाजूच्या त्वचेवर ठळकपणे खूण उमटेल, याची काळजी घेण्याच्या सूचना आधीपासूनच दिलेल्या आहेत.
दरम्यान, मुंबईत काही मतदारांच्या बोटावरील खूण पुसली जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले. या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. मात्र, महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, वापरण्यात येणारा मार्कर हा अधिकृत असून तो पूर्वीपासूनच निवडणुकांमध्ये वापरला जात आहे. निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवावा आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांना केले आहे.
थो़डक्यात
• मतदानानंतर बोटावरील खूण पुसून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट मत
• अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा
• बोटावरील खूण काढली तरी संबंधित व्यक्तीला पुन्हा मतदान करता येणार नाही, असे आयोगाचे स्पष्टीकरण
• मतदान प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित राहील, अशी आयोगाची भूमिका