महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, दोन मयत शिक्षकांना निवडणूक ड्युटीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे शिक्षक वर्गात तीव्र संतापाची भावना असून, प्रशासनाच्या गोंधळलेल्या कारभारावर जोरदार टीका होत आहे.
निवडणूक कामकाजासाठी गैरहजर राहणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कारणे दाखवा नोटिसा पाठवण्यात आल्या. मात्र, याच प्रक्रियेत दोन शिक्षकांचा मृत्यू झालेला असतानाही त्यांच्या नावावर ड्युटी लावण्यात आली आणि त्यांना गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषद शिक्षकांना ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्ये मयत शिक्षकांचा समावेश होणे हा प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा असल्याचा आरोप जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे पदाधिकारी अमोल एरंडे यांनी केला आहे. “या शिक्षकांच्या मृत्यूबाबत संघटनेच्या वतीने आधीच प्रशासनाला माहिती देण्यात आली होती. असे असतानाही त्यांना हजर न राहिल्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे एरंडे यांनी सांगितले.
निवडणूक आदेश देताना वय, अनुभव आणि पात्रतेचा विचार करण्यात आलेला नसल्याचाही आरोप त्यांनी केला. “तीन-चार वर्षांचा अनुभव असलेल्या शिक्षकांना केंद्राध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली, तर ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षकांना खालच्या स्तरावरील कामे देण्यात आली. प्रशासनाने आदेश काढताना किमान पडताळणी तरी करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ५० हजार शासकीय कर्मचारी असताना इतर विभागातील कर्मचाऱ्यांचा विचार न करता केवळ शिक्षकांनाच निवडणूक कामासाठी घेतले जात असल्याने शाळांवर त्याचा परिणाम होणार आहे. दोन शिक्षक असलेल्या शाळांनाही ड्युटी लावण्यात आल्याने अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात बोलताना अमोल एरंडे यांनी संतप्त सवाल उपस्थित केला की, “मयत शिक्षकांसाठी आलेल्या निवडणूक आदेश स्वर्गात कोण पोहोचवणार?” त्यांनी BLO म्हणून वर्षभर काम करूनही पुन्हा महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी दिल्याचा आरोप केला. तसेच बदली झालेल्या शिक्षकांना त्यांच्या जुन्या शाळांवरच आदेश पाठवण्यात आल्याने डेटामधील गंभीर त्रुटी समोर आल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणावर निवडणूक अधिकारी विकास नवाळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “मनपा निवडणुकीसाठी ८ हजार कर्मचाऱ्यांचा डाटा जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला होता. यापैकी अनेक जण गैरहजर राहिल्याने नोटिसा बजावण्यात आल्या. मृत शिक्षकांचा समावेश झाल्याची माहिती संस्थेकडून आम्हाला देण्यात आली नव्हती,” असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतील प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शिक्षक संघटनांनी तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.