चतुर आणि योजनाबद्ध पद्धतीने एका माजी सैनिकाला तब्बल 6 लाख 80 हजार रुपये गंडा घातला. चोरट्यांनी केवळ 80 रुपयांचे आमिष दाखवून ही चोरी केली. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पोलिसांच्या गस्त आणि तपासावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील मयूर पार्कमधील घृष्णेश्वर कॉलनीत राहणारे माजी सैनिक मनोहर कानडजे हे त्यांच्या मूळ गावातील (भोकरदन, जालना) येथील आहेत. जमिनीच्या व्यवहारासाठी जळगाव रोडवरील मयूर पार्क शाखेतून 6.80 लाख रुपये रोख काढून बाहेर पडले. त्यांनी ही रक्कम प्लास्टिक पिशवीत ठेवून दुचाकीच्या हँडलला अडकवली होती. केवळ 400 मीटर अंतरावर गेल्यानंतर एक दुचाकीस्वार त्यांच्या जवळ येऊन म्हणाला, "काका, तुमचे पैसे पडलेत!" कानडजे यांनी मागे वळून पाहिलं असता, 20-20 रुपयांच्या चार नोटा रस्त्यावर पडलेल्या दिसल्या. त्यांनी गाडी थांबवून त्या नोटा उचलायला मागे वळताच, दुसऱ्या दुचाकीवरील चोरटे त्यांच्या गाडीवरून पैसे घेऊन पसार झाले. या प्रकारानंतर हर्सूल पोलिस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश केदार करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.