Fadnavis' first reaction after the Mahayuti's landslide victory in the Municipal Corporation 
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : महायुतीला महापालिकेमध्ये घवघवीत यशानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

मुंबईसह राज्यातील महापालिका आणि नगरनिकाय निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना युतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Published by : Riddhi Vanne

मुंबईसह राज्यातील महापालिका आणि नगरनिकाय निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना युतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ही निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या स्पष्ट व्हिजनसह लढलो. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला विक्रमी जनादेश दिला,” असे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या निकालांमधून महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर किती विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. “प्रत्येक शहर बदलण्याचा, त्या शहरात राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आमचा संकल्प आहे. नागरी सुविधा, पायाभूत विकास आणि सुशासन यालाच जनता पाठिंबा देत आहे,” असे त्यांनी नमूद केले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “भाजप म्हणजे हिंदुत्व आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येत नाही. आम्ही व्यापक हिंदुत्वाची मांडणी करतो आणि त्यामुळेच जनतेपर्यंत पोहोचू शकलो. इतका मोठा जनसमर्थन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचा उन्माद दाखवण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राच्या जनतेने काम करण्यासाठी आम्हाला वेळ दिला आहे.”

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दूरध्वनीवरून अभिनंदन केले. तसेच मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित सातम यांनाही फोन करून बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.

सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कलानुसार, बीएमसीच्या 227 वॉर्डपैकी भाजप-शिवसेना भगवा युती 130 वॉर्डवर आघाडीवर होती. ठाकरे बंधूंना 71 वॉर्डवर समाधान मानावे लागले. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईत भाजप 93 वॉर्डसह सर्वात मोठा पक्ष ठरत असून, शिवसेनेला 27 वॉर्ड मिळाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 62 , मनसे 9, काँग्रेस 14 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 1 वॉर्डवर आघाडीवर होती.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्येही भाजप-शिवसेना युतीने वर्चस्व राखत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मागे टाकले आहे. पुण्यात 162 वॉर्डपैकी भाजप 90 वॉर्डवर आघाडीवर असून, महायुती बहुमताच्या आकड्यापेक्षा खूप पुढे आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजप-शिवसेना युती 90 जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी 37 जागांवर पुढे आहे. या निकालांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेना महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा