बच्चू कडूंचा मोर्चा नागपुरात धडकलाय. कर्जमाफी, सातबारा कोरा आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे संस्थापक व माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या महा एल्गार आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा देत बच्चू कडू त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे जाम करणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली होती.
याचपार्श्वभूमिवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सरकारने पहिल्या दिवसापासून याबाबत सकारात्मक भूमिका ठेवली आहे. आपण चर्चा करू असं आम्ही सांगितलं होतं. बच्चू कडू यांनी मान्यता दिली, मात्र त्यानंतर त्यांनी मला अर्ध्या रात्री संदेश पाठवला की, आम्ही बैठकीला येऊ शकत नाही. बावनकुळे यांनी संपर्क केला आहे, इतके वेगळे प्रश्न मांडले आहेत की आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सुटणार नाही".
"चर्चेचे निमंत्रण आम्ही बच्चू कडू यांना दिलं आहे. रस्ते अडवल्यामुळे लोकांना त्रास झाला आहे. माझं आवाहन आहे की चर्चा करावी लोकांना त्रास होईल असं काही करू नये. हौसे गवसे या आंदोलनात येतात त्यापासून सावध राहणं गरजेचे आहे. रेल्वे रोको करू दिले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही सकारात्मक आहोत, चर्चा करावी मार्ग निघेल. शेतकरी अडचणीत आहेत पावसामुळे शेतमाल खराब झाला आहे .पाहिलं त्यांना मदत करायची का बँकांना मदत करायची? सरकराने 32 हजार कोटींचं पॅकेज दिलं आहे. आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजे. त्यामुळे सर्व प्रकारच्या चर्चेची तयारी आहे."