राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून सर्वच पक्षांचे बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचारात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून आज नाशिकमध्ये संयुक्त प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत अनेक मुद्द्यांवरून हल्लाबोल केला. त्यांच्या भाषणामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापले आहे.
राज ठाकरे यांनी सर्वप्रथम भाजपमधील इनकमिंगवर टीका केली. “राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र येणारे लोक आनंदाने येत नाहीत. रात्री पैसे पोहोचवले जातात,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. “1952 साली जनसंघ नावाने जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागत आहेत, हे दुर्दैवी आहे. तुमची माणसं उभी होती, मग दुसऱ्यांना कडेवर घेऊन नाचण्याची गरज काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘नाशिक मी दत्तक घेतो’ या जुन्या विधानाचा संदर्भ घेत जोरदार टोला लगावला. “2017 साली फडणवीस नाशिकला आले आणि म्हणाले नाशिक मी दत्तक घेतो. त्या बोलण्याला नाशिककर भुलले. आम्ही आधी केलेली कामं विसरली गेली. पण दत्तक घेतो म्हटल्यावर बाप परत फिरकलाच नाही,” असा हल्लाबोल करत फडणवीसांनी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यावरण आणि विकासकामांच्या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. “तपोवनातील झाडं छाटायची भाषा सुरू आहे. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते छाटले आणि बाहेरून झाडं आणून पक्षात लावली जात आहेत,” असे उपरोधिक उदाहरण देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
भाषणाच्या उत्तरार्धात राज ठाकरे यांनी मनसेच्या सत्ताकाळातील विकासकामांचा आढावा घेतला. “आमच्या सत्तेत कुंभमेळा यशस्वीपणे पार पडला, एकही झाड कापलं नाही. रतन टाटा यांना नाशिकमध्ये आणलं. पहिल्या पाच वर्षांत धरणातून पाईपलाईन आणून नाशिकचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला. जीपीएस असलेल्या घंटागाड्या, घनकचरा प्रकल्प, वाहतूक बेटांचं सुशोभीकरण आणि बोटॅनिकल गार्डन अशी अनेक कामं केली,” असे सांगत गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पांची दुरवस्था झाल्याचा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे यांच्या या आक्रमक भाषणामुळे नाशिकमधील महापालिका निवडणुकीचा प्रचार अधिकच रंगतदार झाला असून, येत्या काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.