पुण्यामधील एका ढोंगी साधूला मोबाईल अॅपचा वापर करून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 29 वर्षीय प्रसाद दादा ऊर्फ भीमराव तामदार असे या साधूचे नाव असून दिव्या शक्ती आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांना स्वतःच्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करायला लावून त्या अॅपद्वारे लोकांच्या खासगी आयुष्याचा ताबा या साधूने मिळवला होता. त्याद्वारे लोकांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. तसेच त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. त्या साधूबाबाच्या विरोधात अशाच एका ग्रासलेल्या बांधकाम व्यवसायिकाने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
अंधश्रद्धेच्या नावाखाली एका 39 वर्षीय इसमाला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा किळसवाणा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. एका बांधकाम व्यासायिकाच्या बाबतीत हे कृत्य घडले आहे. प्रसाद दादा या भोंदूबाबाने 39 वर्षीय इसमाला आपल्या मधुरवाणीने अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढले. त्या इसमाच्या नकळत त्याच्या मोबाईलमध्ये "एअर ड्रॉईड किड" नावाचे हिडन अॅप इन्स्टॉल केले. अॅपच्या मदतीने त्याने फिर्यादीवर नजर ठेवायला सुरुवात केली. या अॅपद्वारे त्याला त्याच्या मोबाईलचा पूर्ण एक्सेस मिळाला होता. त्या अॅपमध्ये एक छुपा कॅमेरासुद्धा होता. या अॅपद्वारे मोबाईलमधील माहितीचा गैरवापर करत त्या इसमाला प्रेयसीबरोबर अश्लील कृत्य करण्यास आणि वेश्यागमनास भाग पाडले. तसे न केल्यास तुझा मृत्यू अटळ आहे, असे त्या इसमाला सांगितले. तसेच मठाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादीकडून 15 हजार रुपये सुद्धा घेतले. या सर्व गोष्टी हा बाबा त्या हिडन अॅपद्वारे पाहत होता. अशाप्रकारे भक्तांची हेरगिरी करत हा भोंदूबाबा भक्तांना आपल्या जाळ्यात ओढत असे.
दरम्यान, तक्रार करणाऱ्या इसमाचा मोबाईल फोन सतत गरम होत असल्याने त्याने तो आपल्या सायबर तज्ञ मित्राकडे तपासण्यासाठी दिला. तेव्हा त्याचा मोबाईल दुसरा व्यक्ती ऑपरेट करत असल्याचे समोर आले. यावेळी इतर भक्तांशी संपर्क साधला असता त्यांच्याही मोबाईलमध्ये हा हिडन अॅप इन्स्टॉल केलेला होता. त्यावरून या बाबाचे बिंग उघडे पडले. याच्याविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात फसवणूक, मानसिक छळ आणि अॅपद्वारे गोपनीय माहितीचा गैरवापर अशा गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा