थोडक्यात
महाराष्ट्रात नवरात्रोत्सवाची चाहूल लागताच राज्यभरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या नऊ दिवसांच्या या मंगल सोहळ्यासाठी प्रमुख देवी मंदिरांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामुळे सुरक्षेपासून ते भाविकांच्या सोयीपर्यंत प्रत्येक बाबतीत काटेकोर नियोजन झाले आहे.
Know What are the New Rules of Navratri : महाराष्ट्रात नवरात्रोत्सवाची चाहूल लागताच राज्यभरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या नऊ दिवसांच्या या मंगल सोहळ्यासाठी प्रमुख देवी मंदिरांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईची महालक्ष्मी, पुण्याची चतु:श्रुंगी आणि नागपूरची कोराडी अशी राज्यभरातील प्रसिद्ध मंदिरे लाखो भाविकांच्या गर्दीने फुलणार आहेत. त्यामुळे सुरक्षेपासून ते भाविकांच्या सोयीपर्यंत प्रत्येक बाबतीत काटेकोर नियोजन झाले आहे.
मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांचा प्रचंड ओघ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्ज करण्यात आला असून तब्बल ७७ कॅमेऱ्यांतून सतत लक्ष ठेवले जाणार आहे. प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर आणि बॅग स्कॅनिंगची सोय राहील. दर्शनासाठी येणाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी भुलाबाई देसाई मार्गावर मोठा मंडप उभारण्यात आला आहे. पिण्याचे पाणी, शौचालय, पादत्राणे ठेवण्याची सोय, तसेच वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टर आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी साडेपाच ते रात्री दहा या वेळेत दर्शन खुले राहील, मात्र यावर्षी गाभाऱ्यात प्रवेशबंदी असेल. सकाळ-दुपार-संध्याकाळच्या आरत्या मात्र निश्चित वेळेनुसार पार पडतील. मंदिर परिसरातील कायदा-सुव्यवस्थेची धुरा गावदेवी पोलिसांकडे असून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम ताडदेव पोलिस पाहणार आहेत.
पुण्यातील चतु:श्रुंगी मंदिरात घटस्थापना सकाळी पार पडणार असून त्यानंतर देवीचा अभिषेक आणि पूजनाने नवरात्राचा श्रीगणेशा होईल. नऊ दिवसांत तब्बल ७२ भजनी मंडळांकडून कीर्तन-भजनांचा सोहळा रंगेल. दर्शनासाठी भाविकांना रांगेतून सहजतेने प्रवेश मिळावा यासाठी विशेष मार्ग आखण्यात आले आहेत.
विदर्भातील कोराडी देवी मंदिरात यंदा ५,५५१ घटांची स्थापना होणार आहे. नागपूरसह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून भाविक येथे दाखल होतात. सुरक्षिततेसाठी २५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसवण्यात आले असून महिला पोलिसांचाही बंदोबस्त आहे.
याचबरोबर, नागपूरमध्ये नवरात्र आणि धम्मचक्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन बदलण्यात आले आहे. दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस आणि कोराडी ते सीताबर्डी दरम्यान ११० विशेष बस धावणार आहेत. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान लाखो अनुयायांच्या सोयीसाठी ही वाहतूकसेवा ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, गणेशोत्सव आटोपताच मूर्तीकार पुन्हा कामात व्यस्त झाले आहेत. रंगकाम व सजावट अंतिम टप्प्यात असून ७ ते ८ फूट उंच मूर्तींना अधिक मागणी आहे. कारागीर रात्रंदिवस श्रम करून काम पूर्ण करत आहेत. दुसरीकडे, रासगरबा आणि दांडियाचा जल्लोषही राज्यभर रंगात आला आहे. सोसायट्या, मंगल कार्यालये, तसेच सांस्कृतिक मंडळांमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन होत असून महिला आणि तरुणी विशेष उत्साहाने प्रशिक्षण घेत आहेत. परंपरा आणि भक्तिभाव यांचा मिलाफ साधत यंदाचा नवरात्रोत्सव अधिक रंगतदार होणार आहे.