बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान आज 60 वर्षांचा झाला असून, त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईतील ‘मन्नत’ बंगल्याबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही मध्यरात्रीपासूनच चाहत्यांनी ‘मन्नत’च्या बाहेर हजेरी लावली आणि आपल्या आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस साजरा केला. रात्री बारा वाजताच मुंबईतील ‘मन्नत’ परिसर प्रेम आणि उत्साहाच्या लाटेने भरून गेला. चाहत्यांनी “We love you SRK” आणि “Happy Birthday King Khan” अशा बॅनर्ससह शाहरुखसाठी शुभेच्छा दिल्या. अनेकांनी हातात पोस्टर्स, फुगे आणि फटाक्यांसह वाढदिवसाचा जल्लोष केला.
चाहत्यांनी ‘शाहरुख, शाहरुख’च्या घोषणा देत परिसर गाजवला. अनेक चाहते केवळ त्याची एक झलक पाहण्यासाठी देशभरातून मुंबईत पोहोचले. त्यापैकी काही जणांनी तर लांबचा प्रवास करून मन्नतपर्यंत मजल मारली. कोलकात्यातील ‘SRK Warriors’ या ग्रुपमधील प्रिन्स सिंग हा शाहरुखचा चाहता विशेष लक्षवेधी ठरला. त्याने ANI शी बोलताना सांगितले, “मी माझ्या टीमसोबत कोलकात्यातून 33 तासांचा रेल्वे प्रवास करून मुंबईत आलो आहे, फक्त SRK ला एकदा पाहण्यासाठी. हजारो चाहते येऊ इच्छितात, पण पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी काहींनाच प्रवेश दिला आहे. तरीही आम्हाला खात्री आहे की शाहरुख आज किंवा उद्या बाहेर येऊन आम्हाला भेटेल.”
शाहरुख खानच्या प्रवासाची कहाणी चाहत्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. ‘फौजी’ मालिकेतील एका साध्या सैनिकाच्या भूमिकेतून सुरुवात करून तो आज जगातील सर्वात मोठ्या चित्रपट ताऱ्यांपैकी एक बनला आहे. त्याची ही यशोगाथा आजही दाखवते की मनापासून स्वप्ने पाठलागली, तर ती प्रत्यक्षात उतरतात. म्हणूनच शाहरुख खान केवळ त्याच्या चित्रपटांसाठीच नव्हे, तर त्याच्या संघर्षमय प्रवासासाठी आणि विनम्र स्वभावासाठीही अनेक पिढ्यांतील लोकांच्या हृदयात आजही ‘किंग ऑफ बॉलीवूड’ म्हणून राज्य करतो.