अमावस्येविषयी समाजामध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. अमावस्या काही ठिकाणी अशुभ मानली जाते. मात्र, मराठवाड्यात विशेषतः लातूर, धाराशिव, नांदेड आणि बीड या भागतले शेतकरी वेळ अमावस्येचा सण आनंदाने साजरा करतात. मृग नक्षत्रात खरिपाच्या पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या ही 'वेळा' म्हणजेच येळी अमावस्या असते. हिरव्या शिवारात आप्तेष्ठांना नैसार्गिक भोजनाचा आनंद घेण्यासाठी शेतकरी आमंत्रण देतात. यावर्षी ही हा सण तितक्याच उत्साहात साजरा होत आहे.
“होलग्या होलग्या-सालन पलग्या” म्हणत आजच्या दिवशी शेतात पूजा केली जाते. दर्श अमावास्येला आपल्या सख्ख्या-सोयर्यांना, मित्रांना आणि अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात जेवायला बोलवतात. शेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटुंबिय लक्ष्मी मातेकडे करतात.
काय आहे वेळा अमावस्येचं महत्त्व?
सर्वदात्या काळ्या आईचे आपण काहीतरी देणं लागतो. या पवित्र भावनेने दर्श अमावस्या ही 'वेळ अमावस्या' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. शुभकार्यात अमावस्या या तिथीला निषद्ध मानले जाते. मात्र, अमावस्या ही लक्ष्मीच्या पुजेसाठी महत्वाची असते. दिपावलीमध्येही कुबेर लक्ष्मीचे पुजन अमावस्येदिवशी होते. तिजोरीची पूजा, वहीची पूजा व्यापारी अमावस्येदिवशीच करतात. तर वेळ अमावस्येदिवशी शेतामध्ये कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच पिकांचीही पूजा केली जाते. आंब्याच्या झाडाखाली पाच खडे कव व चुण्याने रंगवून पांडवाची पुजा मनोभावे केली जाते. सुगड्यामध्ये आंबिल ठेवलेले असते. ज्वारीच्या रानात चार पाच पाच दहाटाला एकत्रित करून एखादे वस्त्र गुंडाळून फळाफळांवळसह लक्ष्मीची आईची ओटी भरून नैवेद्य दाखविला जातो. धन धान्य लाभू दे आणि शेत शिवार चांगलं फुलू दे अशीच भावना या दिवशी शेतकरी व्यक्त करत असतात.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-